जळगाव, (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांसाठी तिरंगा राखी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या अनोख्या उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचा उद्देश केवळ सर्जनशीलतेला वाव देणे हा नसून, पालकांमध्ये सांस्कृतिक जागरूकता आणि एकतेची भावना जागृत करणे हा देखील होता. या माध्यमातून पालक आणि मुलांमधील नाते अधिक घट्ट होईल, तसेच मुलांना भारतीय संस्कृती आणि सणांचे महत्त्व कळेल, असे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. उपशिक्षिका स्वाती नाईक यांच्या नियोजनाखाली आणि मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. स्पर्धकांनी आपली कल्पनाशक्ती वापरून सुंदर आणि आकर्षक राख्या तयार केल्या.
स्पर्धेनंतर संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते उत्कृष्ट राख्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सर्जनशीलता, कारागिरी आणि प्रतीकात्मक प्रतिनिधित्वाचा विचार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका शितल कोळी, उज्वला नन्नवरे, कविता सानप, रूपाली आव्हाड, सरला पाटील, सुवर्णा अंभोरे आणि शारदा तडवी यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक आनंददायी अनुभव मिळाला.