जळगाव, (प्रतिनिधी) : जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून भविष्यात दिव्या देशमुख आणि गुकेश डोम्माराजू यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडतील, असा विश्वास ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी व्यक्त केला आहे. खेळाडूंनी जिद्द आणि चिकाटीने मेहनत घेतल्यास देशाचे नाव जगभरात उंचावेल, असे प्रेरणादायी आवाहनही त्यांनी या वेळी केले.
संपूर्ण देशातून आणि परदेशातून ११ वर्षांखालील ५३८ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले असून खेळाडू आणि त्यांच्या पालकांची उत्तम व्यवस्था केली आहे.
या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या उद्घाटनावेळी कुंटे बोलत होते. यावेळी भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, कोषाध्यक्ष विलास म्हात्रे, मुख्य पंच देवाशीष बरूआ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील पाच वर्षांचा वल्लभ अमोल कुलकर्णी, आठ वर्षांखालील आशियाई विजेता अद्वित अग्रवाल, १० वर्षांखालील विश्वविजेता मनिष शरबातो, तसेच सात वर्षांखालील जागतिक स्कूल गेम विजेती प्रणिता वकालक्ष्मी यांसारखे उदयोन्मुख खेळाडू सहभागी झाले आहेत. याव्यतिरिक्त, युएई, अबुधाबी, जर्मनी आणि मलेशिया येथील भारतीय वंशाचे १४ खेळाडूही यात आपला खेळ दाखवत आहेत.