जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरात त्रिवेणी समूहातर्फे आयोजित “श्रावण सरी २०२५” या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील हतनूर सांस्कृतिक हॉल, महाबळ रोड येथे झालेल्या या उपक्रमात महिलांनी पारंपरिक मराठमोळी वेशभूषा करून मराठी गीतांवर आधारित गाणी आणि नृत्ये सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या तीन कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर “श्रावण सरी २०२५” च्या निमित्ताने समाजात आदर्श निर्माण केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या सुधा काबरा, वंदना पाटील आणि दिशा ठाकूर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यानंतर महिला भगिनींनी वैयक्तिक आणि विविध समूहांमध्ये मराठी पारंपरिक गीते, भावगीते आणि लोकगीते सादर केली. त्यांच्या गाण्यांनी आणि नृत्यांनी महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, योगाचे महत्त्व आणि विविध सामाजिक विषयांवरील जनजागृतीचा संदेश दिला.
महिलांनी गीतांच्या तालावर ठेका धरत संपूर्ण सभागृह उत्साहाने भारून टाकले.
गेल्या तीन वर्षांप्रमाणेच याही वर्षी ‘श्रावण सरी’ कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात ४०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध खाद्यपदार्थ, कपड्यांचे आणि अन्य वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच महिलांसाठी मोठ्या प्रमाणात लकी ड्रॉ काढून आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विविध संस्थांचा महत्त्वपूर्ण हातभार लाभला. त्रिवेणी समूहाच्या आयोजक सुरेखा राहुल पवार, वैशाली जितेंद्र बोंडे आणि शुभांगी पराग पाटील यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम केवळ मनोरंजनपर नव्हता, तर महिलांच्या कलागुणांना वाव देणारा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.