जळगाव, (प्रतिनिधी) : निसर्ग संवर्धन आणि मातृप्रेमाचा अनोखा संगम साधणाऱ्या ‘एक वृक्ष आईच्या नावे’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ जळगावच्या मोहाडी टेकडीवर प्रचंड उत्साहात पार पडला. यावेळी पर्यावरणप्रेमी नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, माजी आ. ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी विनय गोसावी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, वनविभागाचे श्री. बोरकर, माजी महापौर विष्णू भंगाळे, शहर अभियंता योगेश बोरोले, मनपा पर्यावरण विभाग प्रमुख इंजि. प्रकाश पाटील, उद्योजक सुनील चौधरी, सुयोग चौधरी, सुमोल चौधरी, अजीज सालार, फारुक शेख, शाहिद अली, मतीन पटेल, किरण तळले, डॉ. सविता नंदनवार, सौंदर्या महाडिक, हिरा चौधरी, निलोफर देशपांडे, खुशबू देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
५००० देशी झाडांचे वृक्षारोपण..
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करंज, कांचन, जांभूळ, शीसम, फापडा, धावडा, रेन ट्री, कदंब, उंबर, मोह, गोरख चिंच, चिंच, बेहडा, बांबू, वड, हादगा यांसारख्या विविध प्रकारच्या ५,००० देशी वृक्षांची रोपे लावून निसर्ग स्नेहाचा सुंदर संदेश दिला गेला. वृक्षारोपणासोबतच, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोहाडी टेकडी परिसरात २ लाख देशी वृक्षांच्या बीजांची पेरणी करण्यात आली. भविष्यात या परिसरात एक भव्य ‘ऑक्सिजन पार्क’ साकारण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प या वेळी घेण्यात आला.
या उपक्रमासाठी डॉ. नितीन महाजन (अप्पर जिल्हाधिकारी, अलिबाग), उद्योजक सुबोध चौधरी, अश्विन चौधरी, आणि मराठी प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला. तसेच, रोटरी क्लबचे सदस्य देखील मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले. दरम्यान वृक्षारोपणानंतर मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी उपस्थितांना वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ दिली.