जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात रविवारी दुपारी जुन्या वादातून दोन तरुणांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत धीरज दत्ता हिवराळे (वय २७) या तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत दुसरा तरुण कल्पेश वसंत चौधरी (वय २५) गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सम्राट कॉलनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हिवराळे आणि कल्पेश चौधरी यांच्यात पूर्वीपासून वाद होते. रविवारी दुपारी सम्राट कॉलनीमध्ये दोघे समोरासमोर आले असता त्यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोघांनीही एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. धीरज हिवराळे याच्या छातीत खोलवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसरीकडे, या हल्ल्यात कल्पेश चौधरी याच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हा रुग्णालयात तैनात करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच धीरजच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती, त्यावेळी रुग्णालयात शोकाकुल वातावरण होते.
या घटनेमुळे सम्राट कॉलनी परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. तसेच, नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.