जळगाव, दि.16 – लाॅकडाऊनच्या आव्हानात्मक परिस्थितीचा समाजातील प्रत्येक घटकावर परिणाम झालेला आहे. परंतु चित्रकारांनी लॉकडाऊन च्या काळाचा सदुपयोग करत चित्र चितारलेलं आहे. हे एक सुंदर प्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे कलादालन येथे मांडले आहे. तरुणांसह सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यावी व काहीतरी बोध घेऊन नवी प्रेरणा घ्यावी, यातुन आपल्या प्रतिभेला नक्कीच चालना मिळेल असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.
संजीवनी फाउंडेशन संचलित व परिवर्तन जळगाव आयोजित पद्मश्री भवरलाल जैन यांच्या जयंतीदिनानिमित्ती निमित्ताने ‘भाऊंना भावांजली’ महोत्सवातील जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या ‘लाॅकडाऊन डायरी’ या चित्र प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध आर्किटेक गिमी फरहाद, अनिष शहा, अनिल कांकरिया, विकास मलारा, विजय जैन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्यासह कलाप्रेमी उपस्थित होते. या चित्रप्रदर्शनात राजू महाजन, राजू बाविस्कर, विकास मल्हारा, विजय जैन, शाम कुमावत, पिसुर्वो सुरळकर या सहा प्रसिद्ध चित्रकारांसह निलेश शिंपी, ओशीन मलारा, प्रसेन बाविस्कर या युवा चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे. हे चित्र प्रदर्शन दिनांक १९ डिसेंबर पर्यंत संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.