जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गणेश कॉलनी परिसरातील प्रोफेसर कॉलनी येथे सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वी कारवाई केली. या कारवाईत एका २५ वर्षीय बांगलादेशी तरुणीची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालवणाऱ्या पूजा आत्माराम जाधव (वय २७, रा. प्रोफेसर कॉलनी, जळगाव) या महिलेला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील एका सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन प्रोफेसर कॉलनी येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर कुंटणखान्याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला चौकशीचे आदेश दिले.
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पथकांनी प्रोफेसर कॉलनी येथील संशयित घरावर धाड टाकली. पोलिसांनी स्वतःची ओळख दिल्यावर पूजा जाधव या महिलेने दरवाजा उघडला.
घराची झडती घेतली असता, तेथे एक २५ वर्षीय बांगलादेशी तरुणी आढळून आली. पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी बांगलादेशी तरुणीने धक्कादायक जबाब दिला. तिने सांगितले की, २३ जुलै रोजी ती नाशिक रेल्वे स्टेशन येथे असताना संशयित पूजा जाधव हिने “तुला जळगावात नोकरी लावून देते” असे आमिष दाखवून तिला जळगावला आणले. मात्र, येथे आल्यावर तिच्यावर बळजबरीने देहव्यापार करण्यास भाग पाडले जात होते.
घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करून आवश्यक तो मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अश्विनी सावकारे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे, नितीन बाविस्कर यांच्यासह जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल भारती देशमुख आदींच्या पथकाने पार पाडली.