जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (GMC) आणि जळगाव सर्जिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एक यशस्वी लेप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत प्रगत लेप्रोस्कोपिक तंत्रांचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, ज्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि सर्जनना अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धती शिकण्याची संधी मिळाली.
कार्यशाळेचा आरंभ महाविद्यालयाच्या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये झाला. नाशिकचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. संदीप सबनीस यांनी या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना लेप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रियेचे बारकावे समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शस्त्रक्रियांचे थेट प्रात्यक्षिक करण्यात आले, जे उपस्थितांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. मारोती पोटे आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जळगाव सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील आणि सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांनीही या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या कार्यशाळेचा १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. ही कार्यशाळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावच्या वैद्यकीय शिक्षण आणि शस्त्रक्रिया क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्टतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली आणि त्यांना आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची ओळख झाली.