जळगाव, (प्रतिनिधी) : ग्राहकांना अचूक आणि वेळेवर वीजबिल मिळावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टीओडी (Time of Day) वीजमीटर आता जळगाव जिल्ह्यातही बसवण्यात येत आहेत. हे मीटर अत्याधुनिक आणि स्मार्ट असले तरी, ते प्री-पेड नसून पोस्टपेड आहेत. म्हणजेच, पूर्वीप्रमाणेच वीज वापरल्यानंतरच ग्राहकांना बिल मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. यामुळे वीज बिलांच्या संदर्भात येणाऱ्या ग्राहक तक्रारींमध्ये मोठी घट अपेक्षित आहे.
मानवी हस्तक्षेप नाही, अचूक बिलिंगची हमी..
या नवीन टीओडी मीटरमध्ये मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. हे मीटर ऑटोमॅटिक मीटर रीडिंग (AMR) प्रणालीवर आधारित असल्यामुळे, वीज वापरणाची नोंद अत्यंत अचूक आणि वेळेवर घेतली जाते. यामुळे ग्राहकांना योग्य वीजबिल मिळेल आणि बिले चुकीची असल्याच्या तक्रारी लक्षणीयरीत्या कमी होतील, अशी अपेक्षा आहे.
कोणत्या ग्राहकांसाठी टीओडी मीटर?
सध्या कृषी वर्गवारी वगळता इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत. जळगाव परिमंडलात एनसीसी (NCC) या एजन्सीला हे काम सोपवण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सरकारी कार्यालये, सरकारी निवासस्थाने, मोबाईल टॉवर्स आणि नादुरुस्त मीटर असलेल्या ठिकाणी हे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, नवीन वीजजोडणी देताना तसेच सोलार नेट मीटरिंगसाठीही याच टीओडी मीटरचा वापर केला जात आहे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात 85 हजार टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत.
वीजदरात सवलतीसाठी टीओडी मीटर आवश्यक..
महावितरणच्या नव्या वीजदर प्रस्तावानुसार, ग्राहकाने वीज कोणत्या वेळी वापरली यानुसार दरात सवलत देण्याची तरतूद आहे. ही सवलत मिळवण्यासाठी टीओडी मीटर असणे आवश्यक आहे, कारण ते वेळेनुसार विजेच्या वापराची नोंद ठेवते. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर बसवून घेणे अत्यंत फायद्याचे ठरणार आहे.
महावितरणचे सहकार्यासाठी आवाहन..
महावितरणने ग्राहकांना आवाहन केले आहे की, हे नवीन वीजमीटर अत्याधुनिक आणि स्मार्ट स्वरूपाचे असले तरी, ते प्री-पेड नाहीत किंवा ते बसवण्यासाठी किंवा मीटरच्या किमतीपोटी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. वापरलेल्या विजेची अचूक नोंद घेऊन योग्य वीजबिल देण्यासाठी हे मीटर अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे सर्व वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याच्या कामात महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.