जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या अत्याचारातून ती मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब १८ जुलै रोजी समोर आली.
याप्रकरणी, पीडित मुलीच्या आईने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार, शनिवारी, १९ जुलै रोजी रात्री १० वाजता निखील लिलाधर कोळी (वय २०, रा. मोहन टॉकीजजवळ, जळगाव) या संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.