आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जिल्ह्याबाहेरही विकासाभिमुख कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आ. किशोर पाटील यांनी या मागणीसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्य शासनाच्या सहकार विभागाने या संदर्भात मुंबईत मंगळवारी घेतलेल्या बैठकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यापुढे जिल्हा बँकांनी थेट कर्ज पुरवठा न करता, तो विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत करावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. यामुळे कर्ज वितरणात अधिक सुलभता येईल अशी अपेक्षा आहे.
या महत्त्वाच्या बैठकीला विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदाधिकारी व अधिकारी, सहकार आयुक्त कार्यालय, विभागीय सहसंचालक, तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे शेतकऱ्यांना केवळ जिल्ह्याच्या मर्यादेत न राहता, त्यांच्या शेती जिथे आहे त्या जिल्ह्याबाहेरही कर्जाचा लाभ घेता येणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. आ. किशोर पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळेच विकासाभिमुख कर्ज वाटपातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेली ही भूमिका कौतुकास्पद आहे.
या बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. किशोर पाटील, अनिल पाटील, सहकार आयुक्त तावरे, विभागीय सह निबंधक संभाजी निकम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्यासह विकास सचिवांच्या संघटनेचे अध्यक्ष ईश्वर चव्हाण, गुलाब पाटील, दिलीप चव्हाण, राहुल बोरसे, विजय शेकनाथ पाटील, विजय पाटील, मनोज साळुंखे आदी उपस्थित होते.