पारोळा, (प्रतिनिधी) : येथील बसस्थानकातून प्रवाशाच्या खिशातून ५० हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल चोरून पळणाऱ्या एका चोरट्यास पारोळा पोलिसांनी यशस्वीरित्या अटक केली आहे. कन्हैया रमेश चव्हाण (रा. काळेनगर, शिवाजीनगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा एक साथीदार मात्र पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच पसार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अरुण मानसिंग पवार (रा. जुनोने, ता. रावेर) हे त्यांच्या चुलत सासऱ्यांकडून ऊसतोडचे पैसे घेऊन पारोळा बसस्थानकात आले होते. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातून ५० हजार रुपये आणि मोबाईल लंपास केला. चोरी झाल्याचे लक्षात येताच श्री. पवार यांनी आरडाओरड केली.
याच वेळी बसस्थानकात गस्त घालणारे पोलीस कर्मचारी आशिष पुरुषोत्तम गायकवाड आणि दीपक हिलाल पाटील यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा पाठलाग करण्यात आला. पळत असलेल्या दोन चोरट्यांपैकी कन्हैया चव्हाण याला पोलिसांनी तात्काळ पकडले, तर दुसरा चोरटा गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून चोरी केलेली ५० हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.