जळगाव, (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर जळगावमधील मानव सेवा विद्यालयाचे कलाशिक्षक आणि उपक्रमशील चित्रकार सुनील दाभाडे यांनी आपल्या कलेतून विठुरायाची अनोखी वारी केली आहे. त्यांनी मोरपिसावर रंगांच्या साहाय्याने विठ्ठलाचे अप्रतिम चित्र रेखाटून आषाढी एकादशी साजरी केली. अवघ्या १५ मिनिटांत हे मनमोहक चित्र साकारून त्यांनी उपस्थितांना थक्क केले.
सुनील दाभाडे हे त्यांच्या नाविन्यपूर्ण कलाकृतींसाठी ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी ज्वारीच्या भाकरीवर, पिंपळाच्या पानावर आणि ११११ शब्दांचा वापर करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरेख चित्र रेखाटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या चित्राची वर्ल्ड रेकॉर्ड, लंडन आणि ओ.एम.जी. नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
त्यांनी याआधी तुळशीच्या पानांवर आणि विटेवरही विठूमाऊलीची चित्रे साकारली आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी विटेवर रेखाटलेले विठ्ठलाचे चित्र पंढरपूर येथील मंदिरात पोहोचले आहे. यंदा मोरपिसावर विठुरायाचे चित्र साकारून सुनील दाभाडे यांनी पुन्हा एकदा आपल्या कलेचा आणि भक्तीचा अनोखा संगम साधला आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या आषाढी वारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.