जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी पारोळा येथे केलेल्या यशस्वी सापळा कारवाईत वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना ८,०००/- रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. सागाच्या झाडांची तोडणी परवागनी देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
या प्रकरणी एका ४४ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. तक्रारदार हे शेतात लागवड केलेल्या सागाच्या झाडांची खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय करतात. पारोळा तालुक्यातील इंधवे येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील सागाची झाडे तोडण्यासाठी तक्रारदाराने शेतकऱ्यासोबत ६०,०००/- रुपयांचा व्यवहार केला होता. यासाठी शेतकऱ्याने तक्रारदाराला अधिकारपत्र दिले होते. उपवन विभाग, पारोळा येथून सागाची झाडे तोडण्याची परवानगी मिळवण्यासाठी वनपाल दिलीप भाईदास पाटील (वय ५२, मोडाळा, ता. पारोळा) यांनी तक्रारदाराकडे ८,०००/- रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार दिनांक १९ जून २०२५ रोजी एसीबीला प्राप्त झाली होती.
एसीबीने तात्काळ पडताळणी करून ०२ जुलै २०२५ रोजी सापळा रचला. या सापळा कारवाईदरम्यान, तक्रारदाराकडून वनपाल दिलीप भाईदास पाटील याच्या सांगण्यावरून वनपाल वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय ३८, चोरवड, ता. पारोळा) यांनी पंचांसमक्ष ८,०००/- रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.
याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.