जळगाव, (प्रतिनिधी) : महाजन नगर येथे भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून भरती झालेल्या चारुदत्त संतोष विसपुते (वय २१) याचे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि देशभक्तीपर गीतांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. चारुदत्तचे सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्याचे कुटुंबीय आणि महाजन नगरवासीय आनंदात आहेत.
जळगाव येथील नूतन महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असतानाच, चारुदत्तने २०२४ मध्ये झालेल्या मैदानी परीक्षेत उत्तुंग यश मिळवले. त्यानंतर त्याची अग्निवीर पदासाठी निवड झाली. मध्य प्रदेश येथे ५ जून रोजी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, चारुदत्त आता देशाची सेवा करण्यासाठी कारगिल येथे रुजू होणार आहे.
सीमेवर देशसेवेसाठी जाण्यापूर्वी आपल्या गावी परतलेल्या या वीर जवानाचे स्वागत करण्यासाठी महाजन नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात बंडू वाणी, किशोर नेमाडे, भिकन पाटील, विनोद शेवाळे, मुकेश नाईक, संजय देवरे, भारत पाटील, शरद पाटील, निलेश कासार, कल्पेश सोनार, राजेश बनसोडे, विजय कासार, तुषार नेमाडे, गोलू पांडे, मोंटी राजपूत, अनिकेत चौधरी, गौरव सोनार, सर्व धारकरी आणि परिसरातील माता-भगिनी उपस्थित होत्या.
ग्रामस्थांनी गुलाल उधळत आणि देशभक्तीपर गाण्यांवर ठेका धरत चारुदत्तची जल्लोषात मिरवणूक काढली. या मिरवणुकीने संपूर्ण महाजन नगर परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारून गेला होता. चारुदत्त लवकरच आपल्या देशसेवेसाठी रुजू होणार असून, त्याच्या या प्रवासासाठी ग्रामस्थांनी त्याला शुभेच्छा दिल्या.