जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे भरधाव कारने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरुण शनिवारी दि. २४ रोजी गंभीर जखमी झाला होता. उपचारदरम्यान या तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात शोककळा पसरली आहे. असोदा येथे महावितरण कंपनीत वायरमन म्हणून ते कार्यरत होते.
विजय वामन पाटील (वय ४२, रा. आयोध्या नगर, जळगाव, मूळ मुक्ताईनगर तालुका) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. गेल्या १८ वर्षापासून ते महावितरण कंपनीमध्ये असोदा येथील कार्यालयात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे विजय पाटील यांचे मुले हे मुक्ताईनगर येथे गावी गेले आहेत. त्यांना भेटण्यासाठी म्हणून शनिवार दि. २४ मे रोजी विजय पाटील हे दुपारून जळगाव येथून निघाले होते. साकेगावच्या पुढे त्यांची दुचाकी आली असता भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली.
या धडकेमध्ये विजय पाटील जबर जखमी झाले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा सोमवार दि. २६ मे रोजी रात्री ९ वाजता मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान विजय पाटील यांच्या मृत्यूची वार्ता करताच मुक्ताईनगर तालुक्यात आणि महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शोककाळा पसरली आहे. विजय पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पुढील कार्यवाहीसाठी आणण्यात आला होता. घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.