अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील निमझरी गावाच्या शिवारात दुचाकीवरून घरी जात असलेल्या ५३ वर्षीय प्रौढाचा दुचाकीसमोर अचानक जंगली डुकरांचा कळप आल्याने दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरेश वनराज पाटील (वय५३, रा. निमझरी ता. अमळनेर) असे मयत इसमाचे नाव आहे. ते निमझरी गावात परिवारासह राहत होते. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, रविवारी दि. २७ एप्रिल रोजी रात्री ७ वाजता शेतातील कामे आटोपून सुरेश पाटील हे दुचाकीने घरी जात होते. साधारण साडेसात वाजेच्या सुमारास निमझरी गावाच्या थोड्या अंतरावर सुभाष पवार यांच्या शेताजवळ रस्त्यावरती अचानक जंगली डुकरांचा कळप धावत आल्याने सुरेश पाटील यांच्या दुचाकीचा घसरून भीषण अपघात झाला.
या अपघातात सुरेश पाटील हे रस्त्यावरील बैलगाडीला समोरून धडकले गेले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे दाखल केले असता तेथे वैद्यकीय पथकाने तपासून मयत घोषित केले. सुरेश पाटील यांच्या मुलाच्या खबरीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ सुनील जाधव करीत आहेत.