जळगाव, (प्रतिनिधी) : महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी ५३ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २५ एप्रिल रोजी समोर आली आहे. या प्रकरणी संबधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात रविवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपालसिंह भिंमसिंह राजपूत (वय ६८, रा.यश लॉन परिसर,जळगाव) असे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. गोपालसिंह राजपूत हे भोईटनगर भागातील यश लॉन परिसरात आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहेत. ते १० एप्रिल पासून सोलापूर येथे आपल्या मुलीकडे उन्हाळी सुट्ट्यानिमित्त गेले होते. २५ एप्रिल रोजी गोपालसिंह राजपूत यांच्या शेजाऱ्यांना त्यांचे घर उघडे दिसले, तसेच कडीकोयंडा देखील फेकलेला दिसला. यामुळे शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती गोपालसिंह राजपूत यांना दिली.
त्यानंतर राजपूत यांनी जळगावात येऊन शहर पोलिसांना तक्रार दिली. दरम्यान, या घरफोडीत चोरट्यांनी ३ ग्रॅम सोन्याचे मणी, लहान बाळाची ४ ग्रॅमची सोन्याची चैन, ९ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा तुकडा, चांदीच्या वाट्या, रेमंड कंपनीचे कापड, गाऊन व ५ हजार रुपयांची रोख रक्कम असा ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.