जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील नायगाव धरणाजवळ खेळत असताना पाय सटकून काही मुली पाण्यात बुडाल्या. मुलींना बाहेर काढत असताना एकीचा मात्र मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
खुशी अरमान पटेल (वय १३, रा. साईनगर, जळगाव) असे मयत बालिकेचे नाव आहे. ती साईनगर येथे आई-वडील, भाऊ, बहीण यांच्यासह राहत होती. खुशीचे वडील अरमान पटेल हे चालक म्हणून काम करीत परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. दरम्यान गुरुवारी दि. २४ एप्रिल रोजी खुशीच्या घरातील परिवार शिरसोली परिसरातील नायगाव धरणाजवळ एका दर्ग्याच्या जवळ फिरायला गेले होते. त्या ठिकाणी खुशी आणि तिच्यासोबत आणखी तीन ते चार मुले पाण्याजवळ खेळत होते. त्यांना पालकांनी पाण्याजवळ जाण्यास मनाई केली. मात्र तरीदेखील त्यांनी ऐकले नाही. दरम्यान ख़ुशी पटेल हिच्यासह काही मुले पाण्यात बुडायला लागली.
त्यावेळेला सोबत असलेल्या नातेवाईकांनी मुलींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र खुशी ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच शासकीय रुग्णालयात पीएसआय चंद्रकांत धनके व कर्मचारी अक्षय राजपूत यांनी भेट देत नातेवाईकांकडून माहिती जाणून घेतली. दरम्यान खुशीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.