रावेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा येथील वाघोदा रोडलगत उज्वल नरेंद्र पाटील यांच्या मालकीच्या विहिरीत उडी घेऊन दि.१४ एप्रिल रोजी गावातील देवेंद्र भागवत सोनवणे (वय २७ रा. निंभोरा) या युवकाने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत असताना तेथे दुसरा कमरेपासून खालचा पुरुष जातीचा सांगाडा आढळून आला आहे. निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात मयताचे चुलत भाऊ श्रीराम प्रभाकर सोनवणे यांनी माहिती दिल्याने घटनास्थळी तात्काळ फैजपूर पोलीस उपविभागीय प्रभारी अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी हरिदास बोचरे व फौजदार अभय ढाकणे, पो.हे का. अविनाश पाटील व किरण जाधव यांनी जाऊन विहिरीतील आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह काढण्यासाठी पारंगत व्यक्तींना बोलाविले. विहिरीत मृतदेह काढत असताना त्याचवेळी तिथे एक पुरुष मानवी सांगाडा मिळून आला.
सदरील सांगाडा हा कमरेपासून तर मांडीपर्यंतचा भाग असल्याने निंभोरा पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण करून डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात आलेला आहे. मानवी सांगाड्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर पोलिसांनी तो सांगाडा भातखेडा शिवारातील धरण चौफुली जवळ खड्डा खोदून दोन पंचांन समक्ष पुरला आहे. याबाबत दोन्ही गुन्ह्यात वेगवेगळे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अभय ढाकणे व पो हे. का. अविनाश पाटील, किरण जाधव करीत आहे.