जळगाव, (प्रतिनिधी) : आजचे तरुण उच्चविद्याविभूषित आहेत. हुशार आहेत. ज्ञान, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात आजचे तरुण अग्रेसर आहेत. देशासाठी काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द त्यांच्याकडे आहे. शिक्षण आणि काम करण्याची उर्मी असूनही त्यांच्या हाताला रोजगार नसेल तर त्यांच्यासाठी “खान्देश करिअर महोत्सव” महत्वाची भूमिका बजावत आहे. तरुणांनी अपेक्षित क्षेत्रात नोकरी मिळवून कुटुंबियांसह देशविकासालाही हातभार लावावा, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
सुर्या फाऊंडेशनतर्फे खान्देशातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण करणारा “खान्देश करिअर महोत्सव” दि. १०, ११ व १२ एप्रिल रोजी जळगाव येथे शिवतीर्थ मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवामध्ये ना. गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी दि. ११ एप्रिल रोजी संध्याकाळी उपस्थिती देऊन युवकांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कवी अनतकुमार राऊत, आ.सुरेश भोळे, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, सूर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ. अर्चना सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आजची तरुणाई हीच आपली शक्ती आहे. या शक्तीचा वापर सकारात्मक व्हायला हवा. जगात सर्वात जास्त तरुण भारतात आहे. त्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून रोजगार मिळण्यास मदत होणे हि महत्वाची गोष्ट आहे, असे ना.गुलाबराव पाटील म्हणाले.
दिवसभर ५०० पेक्षा अधिक तरुणांनी दिली भेट..
विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी आणि उद्योगजगतातील मान्यवर मार्गदर्शन करीत आहे. या महोत्त्सवाला शुक्रवारी दि. ११ एप्रिल रोजी जवळपास ५०० पेक्षा अधिक तरुणांनी भेट देऊन विविध संस्थांची व रोजगाराविषयी माहिती जाणून घेतली.
कवी अनंत राऊत यांच्या कवितेने भारावले वातावरण..
शुक्रवारी दि.११ एप्रिल रोजी सायंकाळी कवी अनंतराव राऊत यांचे “मैत्री आणि करियर” संदर्भात विशेष व्याख्यान झाले. आई-वडिलांचा सांभाळ करा, एक तरी मित्र जपा असा संदेश देत कवी राऊत यांनी समाजातील प्रश्नांवर प्रकाश टाकला. करियर करताना आपण सामाजिक बांधिलकी जोपासण्याला देखील प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. अनंत राऊत यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या कविता सादर करत श्रोत्यांच्या काळजाला हात घातला. त्यांच्या “शेतकऱ्याचं नशीब फळलं की काय? दिवाळी न्हाय, दसरा न्हाय…” या ओळींनी उपस्थित भावुक झाले.
नागपूर येथील ‘एनडीए’कडून मार्गदर्शन..
नागपूर येथील नॅशनल डिफेन्स अकादमी येथील अधिकाऱ्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. संरक्षण दलात असणाऱ्या विविध रोजगाराच्या संधी याविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण टिप्स उपस्थित तरुणाईला सांगितल्या. कलावंत सोमनाथ पाटील यांनी अतिशय सुंदर असे बासरीवादन केले.
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, लाभ घेण्याचे आवाहन..
विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा लाभ घेऊन करिअरच्या योग्य दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रत्येक दिवशी आकर्षक बक्षिसे आणि कार्यशाळाआहेत. हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत शिवतीर्थ मैदानावर असणार आहे.
आज सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व समारोप..
महोत्सवाचा समारोप दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता शालेय शिक्षण मंत्री ना.दादा भुसे अध्यक्षतेखाली होणार आहे. यादिवशी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार असून शालेय संस्थाना पुरस्कार व आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.