चाळीसगाव, (प्रतिनिधी) : येथील नागद रोडवर असलेल्या मिरची बाजाराला शुक्रवारी दि. ११ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली आहे. यात १२ दुकाने जळून खाक झाली असून ५० लाखाच्यावर नुकसान झाले आहे. एक मालट्रक व दुचाकी जळून खाक झाली आहे. या आगीत पेट्रोलपंप थोडक्यात वाचला आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, नगरपालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
शहरात नागद रोडवर मोठा मिरची बाजार भरतो. येथे अनेक व्यापारी त्यांचे दुकाने लावून व्यवसाय करतात. शुक्रवारी दि. ११ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे बाजारात गजबज होती. अचानक बाजाराला एका बाजूने आग लागण्यास सुरुवात झाली. या आगीने मोठे रौद्र रूप धारण केल्याने एकच धावपळ उडाली. बाजाराच्या बाहेर व्यापारी, नागरिक तत्काळ निघाले. बाजारात लागलेल्या दुचाकी बाहेर काढायला लोकांनी सुरुवात केली. आजूबाजूचे नागरिक देखील मोठ्या संख्येने मदतीला धावून आले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच तत्काळ ३ बंब घटनास्थळी दाखल झाले. बाजाराच्या बाजूला असणारा अविरेखा पेट्रोलपंपाजवळ आग जाणार होती. दरम्यान अग्निशमन दलाने तत्काळ आग विझविण्यास सुरुवात केल्याने हा पेट्रोलपंप आगीच्या चपेट्यात आला नाही.
मात्र जवळील एक मालट्रक आणि बाजारातील दुचाकी जळून खाक झाली आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. तसेच तत्काळ मदतीसाठी प्रयत्न केले. चाळीसगाव शहरात मागील दोन ते तीन दिवसांमध्ये आग लागण्याची ही दुसरी घटना घडलेली आहे. साधारणतः दोन ते तीन दिवसांपूर्वी चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बेलगंगा सहकार कारखान्याजवळ आग लागली होती. मिरची बाजाराच्या आगीत सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहेत. सुमारे ५ किलोमीटरपर्यंत आगीचा धूर दिसून येत होता.