जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील दाणा बाजार भागातील एका बँकेच्या समोरून जात असताना, चोरट्यांनी पतीसोबत जात असलेल्या महिलेची पर्स लांबवून, त्यातील ३८ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीता एकनाथ वाणी ( वय ५०, रा.पाटीलवाडा) या पतीसह शहरात रविवारी श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रा पाहण्यासाठी आल्या होत्या. मिरवणुका पाहून झाल्यानंतर दाणा बाजार परिसरातील एका बँकेच्या ठिकाणी काही अज्ञातांनी सुनीता वाणी यांच्या हातातील पर्स लांबवली. त्या पर्समध्ये ३५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, ३५०० रुपयांची रोख रक्कम असा ऐवज होता. काही वेळानंतर महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर महिलेने शहर पोलिस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी हे करत आहेत.