सोयगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोसला येथे कर्जाच्या विवंचनेतून एका ३५ वर्षीय महिला शेतकरीने गुढीपाडव्याच्या दिवशी दि. ३० मार्च रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
प्रतिभा बापू मघ (वय ३५) असे मयत महिला शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती, सासू, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. प्रतिभा मघ यांच्या मालकीची चार एकर शेती घोसला शिवारात आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून शेतीमध्ये येणाऱ्या नुकसानामुळे त्यांच्यावर सुमारे दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचे कर्ज झाले होते. खरिपातील कपाशी पिकांचे नुकसान आणि रब्बी हंगामात अवकाळी पावसाचे संकट यामुळे उत्पन्नावर पाणी फिरले होते.
घटने नंतर त्यांना तत्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद पाचोरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे घोसला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.