चाळीसगाव, (प्रतिनिधी) : शहरातील एका भागात तसेच मध्य प्रदेशमध्ये चाळीसगाव तालुक्यातील एका शिक्षिकेवर फसवणूक करून विश्वास संपादन करीत जबरदस्तीने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. शिक्षिकेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळल्याचेही तक्रारीनुसार समोर आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय शिक्षिका राहतात. मध्यप्रदेशमधील राजासिंग अग्नीदेवसिंग चव्हाण (रा. मरसराहा जि. सिंधी, मध्यप्रदेश) याच्याशी महिलेची ओळख झाली होती. राजासिंग याने हळूहळू महिलेचा विश्वास संपादन करून तिला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर फसवणूक करीत मारहाण करून जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच वेळोवेळी ब्लॅकमेल करून पैसे उकळत मानसिक छळ केला.
सदर घटना दि. २७ डिसेंबर २०२४ ते १ एप्रिल २०२५ दरम्यान चाळीसगाव शहरातील एका भागात व मध्य प्रदेशमध्ये संशयित आरोपीच्या घराजवळ घडली आहे. सदर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि भरत चौधरी करीत आहेत. दरम्यान, राजसिंग चव्हाण याच्यावर जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.