जळगाव, (प्रतिनिधी) : मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. मुख्याध्यापक यांच्या कार्यालयाच्या बाहेर एक पेटी लावण्यात आली आहे. इयत्ता १ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रजातीच्या वृक्षांच्या १० हजार बिया गोळा करुन सीड बँक तयार केली आहे. सीड बँकेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. तसेच हे बियाणे पावसाळ्या पर्यंत सुरक्षीत राहावे यासाठी सर्व बियाणे मातीचे गोळे तयार करुन त्यात ठेवले. सिंमेटच्या वाढत्या जंगलामुळे वृक्षांचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे झपाट्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी शासनातर्फे शतकोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. तसेच वृक्षारोपण करण्यावर भर देण्याचे आवाहन केले जात आहे.
शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेतील आणि परिसरात फिरून विविध प्रजातीच्या वृक्षांचे १० हजार बिया गोळा केल्या. गोळा केलेल्या बियांना कीड लागू नये यासाठी या बिया मातीचे गोळे करुन त्यात सुरक्षीत ठेवण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर गावातील रस्त्याच्या दुतर्फा आणि जंगलाच्या परिसरात या बियांचे रोपण करण्यात येणार आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. या उपक्रमात शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर उपक्रमाला इको क्लबचे सदस्य विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी सहकार्य केले.