जळगाव, (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील प्रौढाला रिक्षातून जात असताना त्याच्या पिशवीतील २५ हजार रुपये लांबवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने रिक्षा चालक आणि त्याचा साथीदार दोघांना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
फिरोज शेख शादुल्ला (वय ५०, रा. नांदुरा जि. बुलढाणा) हे अजिंठा चौफुली येथून नांदुरा येथे जाण्यासाठी थांबले होते. त्यांची जवळ एका प्लास्टिकच्या पिशवीत २५ हजार रुपये रोख होते. त्या ठिकाणी आम्ही खामगाव जात आहोत, तुम्हाला कुठे जायचे असे विचारून त्यांना रिक्षात बसविले. रिक्षात बसलेल्या प्रवाशांनी फिर्यादी फिरोज शेख यांना सांगितले की, आम्हाला सीटवर व्यवस्थित बसता येत नाही. तुम्ही रिक्षातून खाली उतरा व दुसऱ्या वाहनात जा. त्यामुळे फिर्यादी हे खाली उतरून त्यांच्याकडे असलेली प्लास्टिकची पिशवी पाहत असताना त्याला कट मारलेला दिसला व त्यात पैसे दिसून आले नाही. फिर्यादी फिरोज शेख यांनी लगेच रिक्षा थांबवण्यासाठी आवाज दिला. पण रिक्षा न थांबता निघून गेली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी नेत्रम प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास केला. त्यात एक संशयित रिक्षा मिळून आली. त्यामध्ये रिक्षा चालक वसीम कय्युम खाटीक (रा. मास्टर कॉलनी) याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार तौसिफ़ खान सत्तार खान (रा. रामनगर, मेहरूण) व एक अल्पवयीन मुलगा अशांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तौसिफ़ खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरीचे ३ गुन्हे दाखल आहेत. सदर संशयित आरोपींबाबत गोपनीय माहिती काढून त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
गुन्ह्यातील फिर्यादी यांची चोरलेली २५ हजार रुपये रक्कम आणि रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ५२५०) जप्त करण्यात आली आहे. हा गुन्हा पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, नाईक प्रदीप चौधरी, कॉन्स्टेबल राहुल रगडे, विशाल कोळी, रतन गीते, गणेश ठाकरे यांचेसह नेत्रम प्रोजेक्ट मधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने उघड करण्यात आला आहे. जळगाव शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी आपल्या परिसरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नेत्रम प्रोजेक्टला जोडण्यासाठी मदत करावी असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.