जळगाव, (प्रतिनिधी) : घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत सीए व्यावसायिकाच्या घरातून ४० हजारांचे थिंकपॅड, आयपॅडसह बँकेची कागदपत्रे चोरट्याने चोरून नेली. ही घटना सोमवारी सकाळी ९.१५ वाजता एसएमआयटी कॉलनीत घडली. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही गॅझेटमध्ये १० पक्षकारांचा डाटा होता तोही गहाळ झाला आहे. संशयित तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला आहे. लोकेश शांतिलाल जांगीड (वय ३२, रा. प्रेमनगर, एसएमआयटी कॉलेजजवळ) हे सीए व्यावसायिक आहे. सोमवारी सकाळी ८ ते ११.३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराच्या वॉलकंपाउंडचे गेट बंद होते. घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. लोखंडी ग्रील व जाळीचा दरवाजा लोटलेला होता. त्यावेळी गेट उघडून २० ते २५ वयोगटातील भामटा दोन वेळा घरात घुसला.
कोणी नसल्याचे पाहून तिसऱ्या वेळी हॉलमध्ये सॅगमध्ये ठेवलेला ४० हजार रुपये किमतीचा थिंकपॅड लॅपटॉप, १५ हजार रुपये किमतीचा आयपॅड, सेंट्रल बँकेचे कर्जासंबंधीचे कागदपत्रे व इतर महत्त्वाचे कागदपत्रे चोरून नेले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सँक चोरणारा संशयित २० ते २५ वयोगटातील, गुलाबी शर्ट व निळी जीन्स घातलेला सीसीटीव्हीत दिसत आहे. खांद्याला बॅग लावून तो सतत मागे पाहत काही अंतर चालत गेला व रिक्षातून पसार झाला आहे.