यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावातील एका शेतकऱ्याचा हरभरा कापून ठेवला होता. दरम्यान या हरभऱ्याला कोणीतरी अज्ञात माथेफिरूने आग लावली. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे मुरली कोळी असे नाव आहे. गेल्या वर्षी देखील त्यांच्याच शेतातील मका पीकदेखील अज्ञाताने जाळून टाकला होता. आता हरभरा पीक जाळून टाकल्यामुळे ते हतबल झाले आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरली कोळी यांनी आपल्या शेतात पाच एकर क्षेत्रावर हरभरा पीक लागवड केली होती. हरभरा पीक आता कापणी योग्य झाल्यानंतर त्यांनी सदर हरभरा कापून शेतात एका ठिकाणी ढीग करून ठेवला होता.
शनिवारी रात्री कोणीतरी अज्ञात माथेफिरूने ढीग करून ठेवण्यात आलेल्या हरभऱ्याला आग लावून दिली. हा प्रकार निर्दशनास येताच शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली. बघता-बघता संपूर्ण मेहनतीने काढलेला हरभरा, डोळ्यांसमोरच पूर्णपणे पेटून खाक झाला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप सूर्यवंशी, पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे.