भुसावळ, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दीपनगर प्रकल्पाबाहेर उभ्या असलेल्या ट्रेलरसह आयशर वाहनातून भल्या पहाटे डिझेल चोरी करून मुक्ताईनगरकडे पसार होणार्या परप्रांतीय डिझेल चोरट्यांच्या टोळीतील दोघांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल अटक केली आहे. संशयीतांचे वाहन रोखताना झालेल्या अपघातात डिझेल चोरी करणार्या टोळीतील एक संशयीत जखमी झाल्याने त्यास जळगावी उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
अनिकेत अमृतसिंग भंडारी, नरेंद्र प्रेमनारायण चौधरी असे अटकेतील तर श्रावण घनश्याम बघेल (सर्व रा.देवास, ईश्वरनगर, बालगडजवळ, मध्यप्रदेश) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवार दि. ७ रोजी पहाटे दीपनगर प्रकल्पाबाहेर उभ्या असलेल्या ट्रेलर (टी.एन.०४ एएल.१६०७) व आयशर (एन.एल.०१ ए.जे.२०७१) उभे असताना संशयीत आरोपी स्वीप्ट (एम.पी.१३ सीई ४०४२) वाहनातून आले व त्यांनी दोन्ही वाहनातून सुमारे चारशे लीटर डिझेल कॅनद्वारे चोरी करून वाहनात ठेवले. हा प्रकार वाहनधारकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोरट्यांनी विरोध केला.
मात्र संशयीत वाहन सुसाट दिशेने घेवून मुक्ताईनगरच्या दिशेने पळाले. मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना माहिती कळवण्यात आल्यानंतर त्यांनी कर्मचार्यांना नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. संशयीत मध्यप्रदेशातील असल्याने ते मुक्ताईनगरमार्गे मध्यप्रदेशात जाणार असल्याचा अंदाज आल्यानंतर मुक्ताई चौकात कर्तव्यावर असलेले जवान सोपान वंजारी यांना माहिती कळवण्यात आली. त्यांनी तत्काळ मुक्ताईनगर पोलीस स्थानकात हायवे आणि समांतर रस्त्यावरील मुक्ताई चौकाकडे पाठविले. सोपान वंजारी यांनी प्रसंगावधान राखून तेथून जाणारा एक ट्रक हा रस्त्यावर आडवा लावला. यात अपेक्षेनुसार संबंधीत स्वीफ्ट कार मधील चोरटे हे समांतर रस्त्यावरून वेगाने मुक्ताई चौकात आले. येथे अचानक समोर आडवा लावलेला ट्रक पाहून त्यांनी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्यांना यश आले नाही. त्यांची स्वीफ्ट कार ही आडव्या लावलेल्या ट्रकवर आदळल्याने संशयीत श्रावण बघेल जखमी झाला. यावेळी वरील तीन्ही संशयीतांना ताब्यात घेत भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
डिझेल चोरीप्रकरणी वाहन मालक अमलप्रीतसिंग जसविंदरसिंग सनसोय (वय ३५, हॉटेल त्रिमूर्ती शेजारी, निंभोरा) यांच्या फिर्यादीवरून संशयीत अनिकेत अमृतसिंग भंडारी, नरेंद्र प्रेमनारायण चौधरी, श्रावण घनश्याम बघेल (सर्व रा.देवास, ईश्वरनगर, बालगडजवळ, मध्यप्रदेश) व कमल राजाराम मालविया (धुलेटिया, उनैल, उज्जैन, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मुक्ताईनगर तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असले तरी अपघातामुळे श्रावण बघेल हा जखमी झाल्याने त्यास जळगावी हलवण्यात आले तर अमनप्रीत व नरेंद्र यास अटक करण्यात आली तर कमल मालविया पसार होण्यात यशस्वी झाला. अटकेतील दोघांना भुसावळ सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली व नंतर त्यांची जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली.