जळगाव, (प्रतिनिधी) : परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेत रविवारी जळगाव शहरातील नामांकित अशा सेवाभावी उपक्रमांचा गौरव करण्यात आला. केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित क्षुधा शांती केंद्र हे जळगाव शहरातील व जिल्ह्यातील अनेकांची जेवणाची भूक भागवणारे केंद्र आहे. अत्यल्प दरात २५ वर्षापासून अविरतपणे अन्नहोत्र चालवणारे हे केंद्र जळगाव शहरातील सेवाभावी उपक्रमाचे एक उत्तम उदाहरण बनले आहे. या सेवाभावी संस्थेचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
परिवर्तनच्या सभासद योजनेत शहरातील सेवाभावी, उत्तम काम करणा-या व्यक्तींचा, उपक्रमांचा, संस्थांचा गौरव करण्यात येतो. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून क्षुधा शांती केंद्राचा सन्मान “थेट तुमच्या घरातून” नाटकाच्या मध्यंतरात करण्यात आला. याप्रसंगी सुलोचना पाटील, सभासद योजनेचे प्रमुख अनिश शहा, अनिल कांकरिया, अमर कुकरेजा, किरण बच्छाव, नारायण बाविस्कर या मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनेते प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांच्या हस्ते मानपत्र देऊन क्षुधा शांती केंद्रांचे प्रमुख संजय बिर्ला व सुनील याज्ञीक यांचा सन्मान करण्यात आला.
मानपत्राचे वाचन लिना लेले यांनी केले. याप्रसंगी क्रेडाई च्या राज्याचे उपाध्यक्ष म्हणून जळगावचे उद्योजक अनिश शहा यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांचाही सन्मान प्रसाद खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्यांदाच जळगावात सकाळच्या सत्रात नाटकाचे आयोजन करण्यात आले, त्यास जळगावकर रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.