जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या जळगाव सी. ए. शाखेचा पद हस्तांतरण सोहळा शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्साहात पार पडला. याप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष सी. ए. अभिषेक कोठारी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांच्याकडे शाखेचा पदभार सोपविला. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणुन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय परिषद सदस्य सी.सी.एम. सी.ए. पियुष छाजेड, सी.सी.एम. सी.ए. उमेश शर्मा, आर.सी.एम. सी.ए. पियुष छाजेड यांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी सीएंच्या परिश्रमामुळेच राज्याला वाढीव जीएसटीचा महसूल मिळाला असल्याचे कौतुकोउद्गार काढले. तसेच ज्या प्रकारे डॉक्टरशी खोटे बोलता येत नाही, त्याच प्रकारे अर्थशास्त्राच्या डॉक्टरशी म्हणजे सीएशी खोटे बोलता येत नाही. अर्थव्यवस्था सुदृढ ठेवण्याचे काम सी.ए. करत असतात. कोरोनाच्या काळातही सीएंनी अतिशय परिश्रम करून देशाला जीएसटीच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळवून दिले. यात सर्वाधीक वाटा महाराष्ट्राला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व सी.ए. सभासदांचे मनापासून कौतुक करत नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
वर्ष २०२५-२६ च्या नवीन कार्यकारिणी सदस्य निवड..
अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल, उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल, सचिव सी.ए. सोहन नेहेते
कोषाध्यक्ष सी. ए. लक्ष्मीकांत लाहोटी, व्यवस्थापन समिती सदस्य म्हणुन सी.ए. पद्मनाभ काबरा व सी.ए. नचिकेत जाखेटिया तसेच सहकारी सदस्य म्हणुन सी.ए. तृप्ती राठी, सी.ए. हितेश जैन यांची नेमणुक करण्यात आली.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत..
आर.सी.एम. सी.ए. पियुष छाजेड यांनी बोलताना जळगाव सी.ए. शाखा चांगली प्रगती करत असुन यासाठी सर्व सी.ए. सभासदांचे अभिनंदन केले. सी.सी.एम. सी.ए. उमेश शर्मा यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना संपूर्ण वर्षभरात आपली कामगिरी बजावताना सर्वांनी सोबतीने जळगाव सी.ए. शाखेला यश मिळवून द्यावे अशा शुभेच्छा दिल्या. सी.सी.एम. सी.ए. पियुष छाजेड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत माजी अध्यक्ष सी.ए. अभिषेक कोठारी यांनी वर्षभरात पार पाडलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले व नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. सर्व सी.ए.सभासदांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. यावेळी नुतन अध्यक्ष सी. ए. हितेश आगीवाल यांनी नवीन वर्षामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी, विविध उपक्रमांसाठी “प्रयास” थीम ठेवुन वर्षभरासाठी त्यांचे नियोजन मांडले. जळगाव सी.ए. शाखा ही पश्चिमी विभागीय सी.ए. शाखामंधील सर्वात जास्त सक्रीय अशी शाखा असुन जळगाव सी.ए. शाखेचे हे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी सर्व सी.ए. सभासद, कार्यकारिणी सदस्य, सर्व माजी अध्यक्ष तसेच विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जळगाव सी.ए.शाखेला उज्ज्वल यश मिळवून देण्याचा आमचा नक्कीच प्रयास राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान नुकत्याच झालेल्या सी. ए. परीक्षेमध्ये पास झालेल्या एकूण ३४ नवीन सी. एं. चा, सी.ए. इंटरमिजीएट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पहिल्या ५ विद्यार्थ्यांचा तसेच जळगाव बॉक्स क्रिकेट लीग २०२४ मध्ये विजेत्या झालेल्या गटांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
‘कर्टन रेझर- इन्कमटॅक्स बिल- २०२५’ या विषयावर चर्चासत्र..
त्याचबरोबर सी.सी.एम. सी.ए. पियुष छाजेड यांचे “कर्टन रेझर- इन्कमटॅक्स बिल- २०२५” या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी सी.सी.एम. सी.ए. पियुष छाजेड यांनी प्राप्तिकर विधेयक २०२५ संबंधी होणारा गोंधळ दूर करण्यासाठी आयकर विभागाने एक ऑनलाइन स्वयं-मदत साधन सुरू केले असुन अधिकृत आयकर विभागाच्या वेबसाइटवर, करदाते आता नवीन प्राप्तिकर विधेयक २०२५ च्या तरतुदींची १९६१ च्या वर्तमान आयकर कायद्याशी तुलना करू शकतात असे मार्गदर्शन उपस्थित सभासदांना केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सी.ए. शिल्पा सेठिया व सी.ए. यश जैन यांनी केले. आभार प्रदर्शन सी.ए. सोहन नेहेते यांनी केले.