यावल, (प्रतिनिधी) : नवीन एसटी बस अचानक सुरू झाल्याने ती बस एका थांबलेल्या बसला घासली गेली. दरम्यान बस मध्ये चढत असताना चालक गंभीर जखमी झाल्याचा प्रकार आज पहाटेच्या सुमारास यावल बस स्टॅन्ड आवारात घडला आहे.
एसटी बस चालकाचे नाव बी.डी. जयकर (वय ४५) असून ते आज शुक्रवार दि ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास अचानक बस सुरू झाल्याने बस थांबवण्यासाठी धावत बसच्या दरवाजात चढत असताना एका थांबलेला बसला ही बस घासली गेली. यात दोन्ही बस मध्ये दाबले गेल्याने चालक जयकर हे जखमी झाले आहेत.
याघटनेमुळे यावल एसटी बस आगारात मोठी खळबळ उडाली होती. जखमी जयकर यांच्यावर तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करीत पुढील उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात पाठविले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी दिली आहे. तसेच जळगाव येथील एसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील रुग्णालयात जाऊन जयकर यांची भेट घेतली.