जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत. दरम्यान अपघातात मृत्यू रोखण्यासाठी सोमवार दि.३ फेब्रुवारीपासून वाहतूक नियंत्रण विभागाच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांना ही सक्ती असून चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे बंधनकारक राहणार आहे. हेल्मेट नसल्यास जागेवरच एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.
शहरात हेल्मेट सक्ती जरी नसली तरी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर तसेच महामार्गावरील चौकामध्ये हेल्मेट सक्ती राहणार आहे. नियम मोडल्यास दुचाकी चालकांना दंड आकारण्यात येणार आहे.
शासनाने राष्ट्रीय महामार्गावर यंदा नवीन वर्षात दि. १ जानेवारी पासून हेल्मेट सक्ती करण्याविषयी आदेश काढण्यात आले. मात्र आता महामार्गावर दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांनाही हेल्मेट सक्ती राहणार आहे. याचे उल्लंघन झाल्यास एक हजार रुपये दंड केला जाणार आहे. यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी चाहतूक पोलिस तैनात राहणार असून ते थेट दंडात्मक कारवाई करणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली.