जळगाव, (प्रतिनिधी) : विद्युत कामे करणाऱ्या ठेकेदाराचा कामाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी तडजोडीअंती २० हजारांची लाच मागून ती कार्यालयात स्वीकारताना चोरवड वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत प्रभाकर इंगळे (४६) याला बुधवारी दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
भुसावळातील ४९ वर्षीय तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार आहेत. त्यांनी एका खाजगी कंपनीचे एनएससी स्किम अंतर्गत नवीन सर्व्हिस कनेक्शनची क्षमतावाढ १०० वॅटहून २०० वेंट करण्यासाठीचा प्रस्ताव आरोपी प्रशांत इंगळे यांच्याकडे दिला होता, मात्र हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यासाठी प्रलंबित होता. हा प्रस्ताव पाठवण्यासाठी इंगळे यांनी बुधवारी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाच मागितल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती २० हजार रुपये लाच स्वीकारण्याचे इंगळे यांनी मान्य केले व चोरवड कार्यालयातच त्यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला ता आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, नाईक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.