जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील खोटे नगर स्टॉपजवळ लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत एका पाणीपुरी विक्री करणाऱ्या तरूणाच्या खिश्यातून २ हजारांची रोकड काढून त्याला चौघांकडून लाकडी दांडका, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. लोखंडी कोयत्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम हकिमचंद यादव (वय २८ रा.खोटेनगर, जळगाव) हा तरूण परिवारासह राहतो. शनिवारी दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गौतम यादव हा खोटे नगर येथील स्टॉपजवळ पाणीपुरी विक्री करण्यासाठी उभा होता. त्यावेळी बुलेटवर गोपाल राजपूत, दादू कोळी, सागर राजपूत, गोलू पाटील (सर्व रा. जळगाव) हे चौघेजण आले. त्यानंतर यातील दादू कोळी याने हातात लोखंडी कोयता घेत गौतम यादव याला धाक दाखवत त्याच्याजवळून २ हजार रूपये जबरी काढून घेतले. त्यानंतर चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर एकाने लाकडी दांडका मारून गंभीर दुखापत केली.
दरम्यान गौतम हा आपला जीव मुठीत धरून पळत असतांना दादू कोळी याने हा लोखंडी कोयता घेवून पाठलाग केला आणि जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर गौतमने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोपाल राजपूत, दादू कोळी, सागर राजपूत, गोलू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.










