जळगाव, दि. 19 – महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व नाट्यगृह खुले करण्याचा निर्णय घेतला त्याला परिवर्तनने प्रतिसाद देत शासनाचे अभिनंदन करत जळगावात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रभर गाजत असलेले परिवर्तन निर्मित ‘नली’ हे एकलनाट्य जळगावच्या कलावंताची निर्मिती आहे. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांच्या व्यक्तिचित्रणावर आधारित व शंभू पाटील यांनी नाट्यरूपातंरण केलेल्या या नाटकाचे मुंबई, पुणे, सातारा, मडगाव, बु-हाणपूर यासह अनेक ठिकाणी प्रयोग झाले आहेत.
अव्यक्त प्रेमाची साधी सोपी गोष्ट कृषी परंपरा, ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था, सामाजिक वास्तव, शेतीचे प्रश्न, आणि प्रेम अशा विविध विषयांन स्पर्श करणारा हा नाट्यप्रयोग रंगभूमीवरील वेगळा प्रयोग म्हणून चर्चा होत आहे. जळगावच्या हौशी रंगभूमीवरील एक नाटक राज्यभरात स्वतंत्र ओळख निर्माण करत ५० प्रयोगांचा उच्चांक गाठतं ही जळगावच्या नाट्यसृष्टीतील महत्वाची घटना म्हटली पाहिजे.
या एकलनाट्याचे दिग्दर्शन योगेश पाटील यांचे असून पार्श्वसंगीत मंगेश कुलकर्णी, वेशभूषा मंजुषा भिडे, प्रकाश योजना राहुल निंबाळकर यांचे आहे. तर निर्मिती प्रमुख नारायण बाविस्कर व पुरूषोत्तम चौधरी हे आहेत. नलीचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग २३ ऑक्टोबर शनिवारी सायं ७ वा. भैय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजित करण्यात आला असून कोरोनाविषयीचे शासनाचे सर्व नियम पाळत प्रयोग सादर केला जाणार आहे. या प्रयोगासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्य लाभले आहे. नाट्यप्रयोगासाठी प्रवेशिका आवश्यक आहे. असे परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी कळविले आहे.