जळगाव, (प्रतिनिधी) : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावत मोठी कारवाई केली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला खाजगी इसमामार्फत ३ लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई मेहरूण तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये झाली. घटनेप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक आण्णा पाटील (वय-५६) असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्यासह खासगी इसम भिकन मुकुंद भावे (वय-५२, रा. आदर्शनगर , जळगाव) या दोघांना मेहरूण तलाव जवळील लेक होम अपार्टमेंट मधील प्लॉट नं. ३ येथे ताब्यात घेण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात मुख्य अधिकारी म्हणून काही महिन्यांपूर्वीच दीपक पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. दरम्यान गुरूवारी दुपारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावत ही कारवाई केली.
या घटनेत आरटीओ कर्मचारी असलेल्या ५५ वर्षीय तक्रारदार निरीक्षकाची नवापूरला सीमा तपासणी नाका येथे मागील महिन्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून ३ लाखांची लाच मागितली होती.
पडताळणी अंती खात्री पटल्यावर छत्रपती संभाजी नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा लावून कारवाई केली. या बदलीसंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी भावे नावाच्या खासगी इसमाच्या माध्यमातून तक्रारदार यांच्याकडे ३ लाखांची लाचेची मागणी केली होती, याची माहिती तक्रारदार अधिकाऱ्याने छत्रपती संभाजी नगर विभागीय लाचलुचपत विभागाला कळविलेली होती.
लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्याप्रमाणे तक्रारदार यांनी खासगी इसम भावे यांच्याकडे ही रक्कम देत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांच्या कोल्हापूर, ठाणे, सांगली, नगर येथील घरांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर कारवाई छत्रपती संभाजी नगर येथील पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्यासह निरीक्षक अमोल धस, पोहेकॉ अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, अंमलदार विलास चव्हाण, सचिन बारसे, सी.एन. बागुल आदींनी कारवाई केली.