जळगाव, (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दिपक शिवाजी चौधरी (वय ४२ रा. झुरखेडा ता. धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. झुरखेडा गावात दिपक चौधरी हे शेतकरी आई, पत्नी व दोन मुलं यांच्या सोबत वास्तव्याला होते. शेती करून ते उदरनिर्वाह करत होते. गुरूवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांची पत्नी छायाबाई ह्या शेतात कामासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी दिपक चौधरी हे घरी एकटेच होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
शेती करण्यासाठी त्यांनी खासगी व सोसायटीकडून ५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यात सततची नापीकीमुळे ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती त्यांच्या गावातील नातेवाईकांनी दिली. दुपारी त्यांची पत्नी घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.