यावल, (प्रतिनिधी) : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वड्री गावाजवळील धरण परिसरात मनमादेवी मंदिर असून या मंदिराजवळ सांडव्याच्या पाण्यात बिबटचे काही बछडे पाणी पिण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी एका १२ वर्षीय बालकावर अचानक एका बछड्याने पाठीवर हल्ला केला. त्यात त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. आजुबाजुचे ग्रामस्थ धावत आल्यानंतर बिबट्याचे बछडे गर्दी पाहून पळून गेले.
विनोद रुपसिंग बारेला (वय १२) असे जखमी बालकाचे नाव आहे. वड्री येथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी वड्री धरण आहे. या धरणाजवळ मनमादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ शनिवारी दुपारी विनोद हा बालक सांडव्यातील पाण्याजवळ गेला होता. दरम्यान तेथे बिबट आणि त्याचे पाच बछडे पाणी पिण्यासाठी आले होते. त्यातील एका बछड्याने या बालकावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार इतर नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी गर्दी करून तेथे धाव घेतल्यामुळे गर्दीला पाहून बिबट आणि त्याचे बछडे तिथून पळुन गेले. दरम्यान तातडीने या बालकाला यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रथम उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. वड्रीसह परिसरात काही बछड्यांसह बिबट्यांचा वावर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने जेरबंद करून बिबट आणि त्याच्या बछड्यांना अभयारण्यातील जंगलात सोडावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.