जळगाव, (प्रतिनिधी) : गेल्या पाच वर्षापासून चोरीला गेलेल्या मोटरसायकल चोरट्यास गोपनीय माहितीच्या आधारे मुद्देमालासह अटक करण्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.
शहरातील शनिपेठ परिसरात राहणारे प्रशांत सानप यांची मोटरसायकल क्रमांक एमएच १९ बी ई ६२३० सन २०१८ साली आव्हाणे शिवारातुन चोरीला गेली होती. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना बुधवारी गोपनीय माहिती मिळाल्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अजिंठा चौफुली येथे दोन चोरीच्या मोटार सायकली विकण्यासाठी आलेल्या जिवन गोकुळ शिंदे रा. कठोरा याला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचुन ताब्यात घेतले.
यावेळी त्याने २०१८ साली जळगावच्या आव्हाणे शिवारातून एक तसेच पुणे विश्रांतवाडी येथुन सुध्दा एक सीडी डीलक्स मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन दोन्ही मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या. मोटरसायकल क्र. एमएच १९ बी ई ६२३० ही प्रशांत सानप यांची तर एमएच १२ जीएच ०८९७ ही मोटरसायकल सुरेश वासुदेव इंगळे रा. विश्रांतवाडी, पुणे यांच्या नावावर असल्याची माहीती मिळुन आली.
आरोपी जिवन गोकुळ शिंदे यास जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात मोटारसायकल सह देण्यात आले आहे. सदर कारवाई ही एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पोहेका, गणेश शिरसाळे, जमीर शेख, किशोर पाटील, पोका नाना तायडे, गणेश ठाकरे, नितीन ठाकरे, किरण पाटील विकास सातदीवे, योगेश बारी यांनी केलेली आहे.