भुसावळ, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दीपनगरातील नवीन ६६० मेगावॉट प्रकल्पात रुग्णवाहिकेवरील चालकाने सुमारे १३ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरले व रुग्णवाहिकेतून हे साहित्य नेताना सुरक्षा रक्षकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. ही धक्कादायक घटना शनिवार घडली.
शशिकांत भागवत चौधरी (वय ४१, रा.फुलगाव ता. भुसावळ) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. दीपनगरातील नवीन ६६० मेगावॉट प्रकल्पातून भेल कंपनीच्या मालकीची फायबर टाकी, लोखंडी अँगल, नटबोल्ड तसेच अन्य लोखंडी साहित्य मिळून १२ हजार ९६० रुपयांचे साहित्य संशयीत शशिकांत चौधरी हा रुग्णवाहिका (क्रमांक एम.एच.१५ जी.व्ही.६७१६) या वाहनातून नेत होता.
शनिवारी दुपारी १ वाजता एम.एस.एफ. सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रवीण खैरे, रोहिदास महाजन, विनोद पवार, प्रवीण पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेची तपासणी करून खातरजमा केली व भुसावळ तालुका पोलीस प्रशासनाला सूचित केले. १२ हजार ९६० रुपयांचे साहित्य व लाखो रुपयांची रुग्णवाहिका पोलिसांनी जप्त करीत चालकाला अटक केली. भुसावळ तालुका पोलिसात एम.एस.एफचे जवान प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरून शशिकांत भागवत चौधरी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे करीत आहे.