कपाट तोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविला
जळगाव, (प्रतिनिधी) : देवीचे पाठ वाचण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करत तीन लोखंडी कपाट तोडून चोरट्याने अंदाजे २० तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना रविवारी दिनांक ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रामानंद नगरात घडली. या घटनेबाबत रामानंद नगर पोलीसात नोंद घेण्यात आली आहे.
▪️आजचा रंग निळा
जळगाव शहरातील रामानंद नगर परिसरात असलेल्या कमल मेडीकलच्या शेजारी गल्लीत वनिता जगन्नाथ चौधरी या वृद्ध महिला एकट्याच वास्तव्यास आहे. त्यांच्या शेजारच्या गल्लीत राहणाऱ्यांकडे दुर्गा सप्तशती पाठ पठनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे वनिता चौधरी या वृद्ध महिला रविवारी ६ ऑक्टोबर रोजी त्याठिकाणी पाठ वाचण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी घराच्या मुख्य दरवाजासह कंपाऊंटच्या लोखंडी गेटला कुलूप लावलेले होते.
दुपारच्या सुमारास गल्लीत कोणीच नसल्याने चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मागच्या बेडरुमधील तीन लोखंडी कपाट तोडून चोरट्याने त्यामध्ये ठेवलेले सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड चोरुन नेली. चोरटा घरात चोरी करीत असतांनाच वनिता चौधरी या वृद्ध महिला पाठ आटोपून घराकडे येत होत्या. यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने चौधरी यांना घरात अजून कोणी आहे का अशी विचारणा केली. यावेळी त्यांनी घरी कोणीच नसल्याचे सांगितल्यानंतर मग तुमच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांना सांगितल्यानंतर चौधरी यांनी लागलीच घराकडे धाव घेतली.
कोणीतरी आल्याची चाहुल लागताच चोरट्याने चौधरी यांच्या घराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दरवाजाने शेजारी आपर्टमेंटच्या पार्कींगमध्ये उडी घेतली. त्यानंतर ऐवज घेवून चोरटा तेथून मागच्या बाजूने पसार झाला.भरदिवसा चोरट्याने वनिता चौधरी यांच्या घरातील तीन कपाटे तोडून त्यामध्ये ठेवलेला ऐवज चोरुन नेला. घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे कर्मचारी संजय हिवरकर यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. रामानंद नगर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.