जळगाव, दि.२४ : ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली या कामगिरीमुळे भारतीयांना जवळपास १०० वर्षानंतर सुवर्णपदक मिळाले या सुवर्णक्षणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार समितीचे सदस्य अशोक जैन व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – अशोक जैन
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपल्या संघाने साधलेला अपूर्व यश हा भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे. आपल्या खेळाडूंनी दाखवलेली परिपूर्ण खेळतंत्र, मानसिक सबलता, आणि जिद्द यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उज्वल झाले आहे. अथक परिश्रम आणि ध्येयाशी असलेल्या निष्ठेमुळेच आपण आज हे यश प्राप्त केले आहे. या विजयामागे केवळ खेळाडूंचा नाही, तर प्रशिक्षक, व्यवस्थापक, संघाचे पदाधिकारी, आणि खेळाच्या प्रत्येक टप्प्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. संघाच्या या संघटित प्रयत्नांमुळेच आपल्याला हा सन्मान मिळाला आहे. आमच्या सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना, आणि संपूर्ण संघाला हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांचे हे फलित असून, भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
अशोक जैन,
सल्लागार समिती सदस्य, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF)
भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती – अतुल जैन
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचा नेत्रदीपक विजय हा देशासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. दोन्ही संघांनी अत्यंत चांगली कामगिरी केली. भारतीय बुद्धिबळपटूंनी आपली प्रतिभा तर सिद्ध केलीच, पण मानसिक कणखरपणा आणि सांघिक कार्यातून हे सिद्ध केले की भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती बनला आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील ही कामगिरी येणाऱ्या पिढीलाही प्रेरणादायी ठरेल. भारतीय खेळाडू जागतिक शतरंज ऑलिंपियाड, ग्रँडमास्टर स्पर्धा, आणि इतर प्रमुख स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या अधिक संख्येने युवा खेळाडूंनी यश संपादित केले आहे. विशेष म्हणजे पुरुष(ओपन) व महिला या दोन्ही गटांत भारताने एकाच वेळी पहिल्यांदाच विजयी सुवर्ण पदक प्राप्त करुन भारताचे वाश्विक स्तरावर वर्चस्व प्राप्त केले आहे. आणि या दृष्टीने त्यांना “गोल्डन जनरेशन” म्हणता येईल
अतुल जैन,
अध्यक्ष, जळगाव जिल्हा चेस एसोसिएशन