यावल (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात बंद असलेल्या घराची जीर्ण भिंत कोसळल्याने सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. हि घटना बुधवार, 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता घडली बालकाला यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राजरत्न सुपडू बार्हे (७, सांगवी बु.॥) असे मयताचे नाव आहे.
सांगली बुद्रुक गावात प्रमोद उल्हास सोनवणे यांचे बंद घर आहे. या घरात कुणीही राहत नाही मात्र संततधार पावसामुळे घराची भिंत जीर्ण झाली असून या भिंतीजवळ बुधवारी सायंकाळी राजरत्न सुपडू बार्हे (७) हा बालक खेळत होता व अचानक सायंकाळी पावणेसहा वाजता घराची भिंत कोसळली. भिंतीखाली हा बालक दाबला गेल्यानंतर ग्रामस्थांनी बालकाला तेथून तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून बालकाला मृत घोषित केले. बालक भिंतीखाली दाबला जाऊन दगावल्याची बातमी समजतात सांगवी ग्रामस्थांसह व मयत बालकांच्या कुटुंबांनी यावल रूग्णालयात धाव घेत आक्रोश केला.