जळगाव | दि.११ ऑगस्ट २०२४ | श्रावण महिना सुरू होताच खान्देशातील भाविकांना वेध लागतात ते कानबाई उत्सवाचे. महाराष्ट्रात खान्देशखेरीज अन्य कुठेही हा उत्सव साजरा होत नसल्याने या उत्सावाला मोठे महत्त्व आहे. कुटुंबातील मंडळी, नातेवाईक देशभरात कुठेही असले तरी ते कानबाई मातेच्या उत्सवाला एकत्र येतात.
यंदा मात्र, कानबाई मातेच्या उत्सवानंतर म्हणजेच ११ तारखेनंतर तीन दिवसांनी सलग काही दिवस सुट्यांचा योग्य असल्याने तसेच नोकरदार वर्गाने रक्षाबंधनाचे नियोजन केले असल्याने कानबाईच्या उत्सवाला येणे टाळले आहे. दरम्यान, उत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील सुभाष चौकात विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई मातेचा उत्सव साजा केला जातो. कानबाई ही खान्देशातील प्रमुख कुलदैवत मानली जाते; पण या देवतेची खान्देशात कुठे यात्रा भरत नाही. नवसपूर्ती करण्यासाठी भाविक कानबाईची प्रतिष्ठापना करतात. या उत्सवाला शनिवारी भाजी- भाकरच्या रोटने सुरुवात झाली.