जळगाव | दि.०७ ऑगस्ट २०२४ | पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मौजे रायपूर येथील निराधार महिलेला मदतीचा हात दिला आहे. निराधार महिला रेखा सकट यांच्या मुलांना शिक्षणासाठी लागणारे संपूर्ण शैक्षणिक साहित्य गुलाबराव पाटील यांनी उपलब्ध करून दिले. तसेच पुढील मदतीचे आश्वासन दिले आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख प्रविण परदेशी यांनी या महिलेविषयी गुलाबराव पाटील यांना सांगितले होते.
मौजे रायपूर येथील निवृत्ती रामदास सकट यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. अशावेळी रेखा सकट यांच्यावर घर सांभाळण्याची जबाबदारी आली. गावात दोन वेळ भाकरी मागून आपल्या मुलांचे पोट त्या भरत होत्या. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ते त्यांच्या आईकडे नेरी येथे राहत आहेत. नेरी येथून त्या मौजे रायपूर येथे प्रत्येक अमावस्याला मागण्यासाठी येत असतात. त्यांची परिस्थिती बिकट असल्याची माहिती शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रविण परदेशी यांच्या लक्षात आली.
परदेसी यांनी ही बाब पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगितली. लगेच याची दखल घेऊन रेखा सकट यांच्या मुलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षणासाठी लागणारे संपूर्ण साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच पुढील मदतीचे आश्वासन देखील दिले.