गजानन पाटील | अमळनेर, दि. 18 – शहरात गणेश उत्सव व आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी शहरातील संवेदनशील भागात पोलीस विभागाच्या वतीने रॅपिड ऍक्शन फोर्स, पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांचे शुक्रवारी पथसंचलन करण्यात आले.
अमळनेर शहरतील संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स व अमळनेर पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड यांचा रूट मार्च घेण्यात आला. यामध्ये शहरातील संवेदनशील भागात मिस्त्र वस्ती व जास्तीत जास्त गणपती स्थापना झालेल्या भागात सदर पथसंचलन करण्यात आले. दरम्यान पथसंचलनाची सुरुवात पोलिस कवायत मैदान येथून सुरू होऊन पुढे वड चौक, झामी चौक, भोई वाडा, माळी वाडा, कसाली मोहल्ला, जामा मशीद, वाडी संस्थान, पानखिडकी, सराफ बाजार, अंदर पुरा मशीद, दगडी दरवाजा, बहेरपुरा मशीद, मोठी बाजारपेठ, झाशी राणी चौक, गांधलीपूरा व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप करण्यात आला. या पथसंचलनामध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स, पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड यांसासह १९६ कर्मचारी सहभागी झाले होते.