नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) भारताने गेल्या दहा वर्षांत मोठा पल्ला गाठला. 10 व्या क्रमांकावरुन अर्थव्यवस्था आता जगात पाचव्या स्थानावर विराजमान झाली आहे. आता तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे भारताची घौडदौड सुरु झाली आहे. पण सर्वसामान्यांना, अर्थतज्ज्ञांना भारत कधीपर्यंत तिसरी महासत्ता होईल, याची मोठी उत्सुकता आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
जगातील गुंतवणूकदार आज भारताकडे आशेने पाहत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. २०४७ पर्यंत विकसीत भारताचे लक्ष्य आपण गाठणार असल्याचा दावा त्यांनी केला. म्हणजे येत्या २३ वर्षांत भारत तिसरी अर्थव्यवस्था असेल. विकसीत भारताकडे वाटचाल या विषयावर त्यांनी मत मांडले. भारतीय उद्योग परिसंघाने अर्थसंकल्पानंतर हा कार्यक्रम आयोजीत केला होता. त्याला देशातील अनेक मोठ्या उद्योजकांनी हजेरी लावली होती.
परिसंघाच्या कार्यक्रमात मोदी सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीची कमतरता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देश अगोदर या धोरणानुसार आपले सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. सध्या देश ८ टक्क्यांच्या दराने आगेकूच करत आहे. आता तो दिवस दूर नाही, ज्यावेळी भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. भारत आता अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाननंतर जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे ते म्हणाले.