जळगाव, (जिमाका) दि. 17 – निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरीकांचा सहभाग वाढावा याकरीता मतदार नोंदणीबाबत नागरीकांमध्ये जनजागृती होणेबरोबरच जिल्ह्यात मतदार नोंदणी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांचे लक्ष गट निश्चित करुन त्यावर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.
जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, एसटीचे विभाग नियंत्रक श्री. जगनोर, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक श्री. नरेंद्र, आकाशवाणीचे सतीश पपू, जिल्हा विज्ञान केंद्राचे श्री पत्की, दिव्यांग आयकॉन मुकुंद गोसावी यांचेसह विविध महाविद्यालय व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले की, जिल्ह्यात नवमतदारांची नोंद होण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा. याकरीता या पक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या लक्ष गटांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. याकरीता युवा, दिव्यांग, स्त्रीया, तृतीयपंथी, स्थलांतरीत नागरीक, शहरी नागरीक, एनआरआय, सेवा मतदार, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरीकांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होणेसाठी सुकाणू समिती सदस्यांनी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालय, महामंडळे, सेवाभावी संस्थांनी मतदार नोंदणी वाढण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा. मतदार नोंदणी कार्यक्रमात 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकाला 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांची नोंदणी करण्यात येत आहे. याकरीता नागरीक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही राऊत यांनी यावेळी केले.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी हुलवळे यांनी स्वीप कार्यक्रमाची रुपरेषा, या कार्यक्रमातंर्गत मतदार जनजागृतीसाठी व नोंदणीसाठी विविध विभागांनी करावयाची कार्यवाही, मतदारांसाठी असलेल्या सुविधा, मतदार नोंदणी कार्यक्रम आदिबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच विविध विभागांनी राबवावयाचे उपक्रम याचीही माहिती दिली. यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांबाबतही या बैठकीत चर्चा करुन रुपरेषा ठरविण्यात आली.